शंभरहून अधिक जणांना अटक; अन्य जिल्ह्यांतही छापे   

मुर्शिदाबादमधील हिंसाचार

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ मोठा हिंसाचार करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.वक्फ नवीन कायद्यावरुन शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यात हिंसाचार झाला. जमावाने रास्तारोखा करताना, पोलिसांवर दगडफेक केली. तसेच, पोलिसांची वाहने जाळली. या सर्व जिल्ह्यांत कारवाईस सुरूवात झाली असून मुर्शिदाबादमध्ये ११० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. सुती येथून ७० जणांना आणि समसेरगंजमधून ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.राज्यात सर्वाधिक हिंसाचार मुर्शिदाबाद जिल्ह्यात झाला असून येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासोबतच, हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. सुती आणि समसेरगंज भागात पोलिसांची गस्त सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करू देणार नाही, असे एका अधिकार्‍याने सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले.सुतीमध्ये हिंसक जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा जमखी झाला. त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. मुस्लिमबहुल भागात हा हिंसाचार झाला. परिस्थिती हाताळण्यास ममता बॅनर्जी यांना अपयश येत असेल, तर त्यांनी केंद्र सरकारची मदत घ्यावी, असे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले.हिंसाचार करणार्‍यांची ओळख पटली पाहिजे. त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. तसेच, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles